जळगाव (प्रतिनिधी) शासकीय अधिकारी, खासगी मक्तेदाराने एका वृद्ध शासकीय मक्तेदाराची तब्बल ५० लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालसिंग हिलालसिंग पाटील (वय ७०, रा. जयनगर) यांची फसवणूक झाली आहे. नाना उखा बोरसे, अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे (संचालक, ग्रॅव्हिटी ग्रुप) या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, लालसिंग पाटील यांचे एल. एच. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची फर्म आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाना उखा बोरसे यांच्या अधिपत्याखाली ते कामे घेत असतात. १० जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता बसवराज शिवराज पांढरे यांच्या शासकीय निवासस्थानी अक्षय ओंकार चोपडे (रा. पुणे), नाना बोरसे हे असताना त्यांनी पाटील यांना बोलावून घेतले. तेथे अक्षय चोपडे हेदेखील मक्तेदार असून त्यांचे काम चांगले असून ग्रॅव्हिटी ग्रुप नावाने त्यांची कंपनी आहे. जिल्ह्यातील २५ ते ३० लाख रुपयांपर्यंतची कामे त्यांना द्या, अशी विनंती बोरसे यांनी पाटील यांना केली. बोरसे यांच्या विनंतीनुसार पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या शिरसोली व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम चोपडे यांना दिले. त्यापोटी १३ लाख ७८ हजार रुपयांचा धनादेशही दिला. तीन दिवसांनंतर चोपडे यांनी हा धनादेश वटवून घेतला होता.
धनादेश देऊनही कामाला सुरुवात केली नाही म्हणून एक महिन्यानंतर पाटील यांनी फोन करुन विचारपूस केली. यावेळी मटेरियल खरेदी सुरू आहे, असे कारण सांगून चोपडेने वेळ मारून नेली. पाटील यांनी बोरसेंना फोन करून याबाबत तक्रार केली. ‘तुम्ही चिंता करु नका तुमचे काम झालेले नसले तर तुम्हाला पैसे मिळून जातील’ असे उत्तर बोरसे यांनी दिले होते. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाना उखा बोरसे, अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे (संचालक, ग्रॅव्हिटी ग्रुप) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला दिलेले १३ लाख ७८ हजार रुपये, शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत असे एकुण ४० ते ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.