अमरावती (वृत्तसंस्था) शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पाहुणी आलेल्या अल्पवयीन मुलीवर गावालगतच्या शेतात २५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यातील अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन, तर त्याचे दोन सहकारी सज्ञान आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना रात्री अटक केली.
शिरजगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १२ वर्षीय मुलगी तिच्या आजीकडे ईदनिमित्त आली होती. २५ एप्रिल रोजी तिच्या आजीने तिला घराशेजारी असणाऱ्या शेतातून बकरीकरिता चारा आणण्यास पाठविले. मात्र, नात शेतातून लवकर न आल्याने आजीने शेत गाठले. त्यावेळी दोन युवकांनी तिला पकडून ठेवले होते, तर १६ वर्षीय मुलगा तिच्यावर अत्याचार करत असल्याचे निदर्शनास आले. कुणीतरी येत असल्याची चाहूल लागताच तिघांनीही पळ काढला.
चारा कापत असताना त्या तिघांनी गाठले आणि दोघांनी पकडून ठेवत अत्याचार केल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आजीने नोंदविली आहे. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला साथ देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. अत्याचार प्रकरणात एक सहकारी हा १७ वर्षांचा असल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. मात्र, त्याच्याशी संबंधित कागदपत्रे मागविल्यानंतर त्याचे १८ वर्षापेक्षा अधिक आढळले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.