नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी अकरावीत शिकणारी एक विद्यार्थिनीच्या पोटात खूप दुखत असल्याने तिची आजी तिला जवळच असलेल्या डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेली. तिथं गेल्यावर आजीने जे काही ऐकलं त्यानंतर तिला खूप मोठा धक्काच बसला. डॉक्टरांनी विद्यार्थिनी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. ही घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये घडली आहे.
कुंडम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या आईचं लहानपणीच निधन झालं होतं. वडील नरसिंहपूर गोटेगाव गावात शिक्षक आहेत. ती आजीसोबत कुंडम येथे राहत होती. तिची आजीदेखील शिक्षिका होती. आजीच्या घरी दोन वर्षापासून एक जण भाड्याने राहत आहे. त्या घरामध्ये तरुणाचं सतत त्यामुळे येणंजाणं असायचं. याच दरम्यान मुलीची आणि तरुणाची एकमेकांशी ओळख झाली. क्लासला आणि शाळेत जाताना तरुण तिला नेहमीच अडवायचा.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शाळेत येत जात असताना तरुण तिला वारंवार तिच्यावर प्रेम करीत असल्याचं सांगत होता. तिने त्याला आधीच नकार दिला होता. जून २०२१ रोजी एक पार्टी ठेवली होती. जेवण छतावर होतं. पीडिता खोलीत एकटीच होती. त्यावेळी तरुण तेथे पोहोचला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. बदनाम करण्याची धमकी दिली. त्यामुळे विद्यार्थिनी खूपच घाबरली आणि तिने याबाबत कोणालाच काही सांगितलं नाही. घाबरून हा धक्कादायक प्रकार लपवून ठेवला.
दरम्यान, जूननंतर मुलीला पाळी येत नव्हती. यानंतर तिने गावातील एका डॉक्टरला दाखवलं होतं. काही महिन्यांनंतर तिची पोटदुखी वाढू लागली. यानंतर तिने आजीला याबद्दल सांगितलं. जेव्हा तिला डॉक्टरकडे दाखवलं तोपर्यंत ती ६ महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर तिला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, धमकी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.















