मुंबई (वृत्तसंस्था) लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अनेक संभाव्य धोके लक्षात घेऊन अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ती कोंडी कधी फुटणार याचे उत्तर आज तरी नसून तूर्त रेल्वेने विशेष लोकलने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आहे.
मुंबई लोकल ही लाइफलाइन मानली जाते. मात्र गेल्या सात महिन्यांहून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना लोकलप्रवासास मनाई आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मर्यादित स्वरूपात विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर देखील खासगी आणि सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना तसेच वकील, खासगी सुरक्षा रक्षक आणि महिला प्रवाशांना काही अटींवर लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या सर्वांसाठीच रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकलमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याबाबत आज संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढवून आता २०२० करण्यात आली आहे. सध्या एकूण १४१० लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत होते. त्यात आता ६१० फेऱ्यांची भर घालण्यात आली आहे. राज्यात अनलॉकचा सहावा टप्पा आजपासून सुरू होत असून आजपासूनच हा वाढीव लोकलफेऱ्यांचा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे.