जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात होत असलेली सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा नियोजन समिती मार्फत पी डब्ल्यू डी, पोलीस विभाग , नाविम्यापूर्ण , सिव्हील हॉस्पिटल, डीन, अपारंपारिक उर्जा, व इतर मंजूर करण्यात आलेल्या 141 कोटी 63 लाखांच्या निधीतून 507 कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील 100 कोटींच्या कामांबाबत सविस्तर आढावा अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांनी सादर केला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावणे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
जिल्ह्यातील 68 मोठया विकासकामांपैकी 40 पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामानंद पोलीस स्टेशन पूर्णत्वास येत असून 10 पोलीस चौक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या 16 पैकी 13 इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
महत्त्वाची प्रकल्पे प्रगतीपथावर
महाराष्ट्रातील पहिले पशु रेतन केंद्र – जिल्हा नियोजन निधीतून हे अभिनव केंद्र उभारले जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. भरोसा सेल इमारत, संविधान भवन बांधकाम, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, वारकरी भवन-राज्यातील अनोख्या वारकरी भवनाच्या बांधकामालाही गती मिळाली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन वारसा इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा हेरिटेज दर्जा कायम ठेवत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेरिटेजच्या नियमांचे पालन करत कार्यालयाचे नूतनीकरण होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर हिरवाईयुक्त असा विकसित करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता श्री. सोनावणे यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.