मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर ते मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आज ना. पाटील यांनी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गावर यशस्वीपणे मात केल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे.
ना. गुलाबराव पाटील यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असतांनाही ते मोबाईलच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनाच्या संपर्कात होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी धरणगावकरांच्या पाणी टंचाईचे निराकरण करण्यासाठी अंजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले होते. रूग्णालयात असतांनाही ना. पाटील हे जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थतीतवर नजर ठेवून होते. तर मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा नियोजन तसेच विविध खात्यांमधून कामांची मंजुरी मिळवणे आवश्यक असल्याने पालकमंत्र्यांनी या कामाचाही हॉस्पीटलमधूनच आढावा घेत, कामांचे नियोजन केले. तर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी जिल्हाधिकार्यांना कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने संसर्ग आटोक्यात आला नाही तर जिल्ह्यात पुन्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात येईल असे निर्देश मिळाले आहेत.