नाशिक (वृत्तसंस्था) ओझर येथील दत्तनगरमधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील मायलेकीवर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा लोखंडी पाइपचा अकरा हजार केव्हीच्या वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
येथील दत्तनगर भागात हनुमंत सोनवणे हे पत्नी मीना व मुलगा अभिषेक यांच्यासमवेत राहतात. त्यांची मुलगी आकांक्षा राहुल रणशूर (रा. गोंदेगाव, ता. निफाड) ही अधिक मासानिमित्त वाण घ्यायला पती व दोन मुलांसह ओझर येथे आली होती. रविवारी (दि.६) दुपारी दीडच्या सुमारास मीना सोनवणे व त्यांची मुलगी आकांक्षा या दोघी आपल्या घरालगत असलेल्या झाडावरील पेरू तोडण्यासाठी गच्चीवर गेल्या. त्यांच्या गच्चीवरून गेलेली वीज वितरण कंपनीची अकरा हजार केव्ही वीज प्रवाह असलेली हाय व्होल्टेजची वायर झाडाजवळच होती.
या मायलेकी हातात लोखंडी पाइप घेऊन पेरू काढत असताना पाइपचा वायरला स्पर्श झाला. त्यात त्यांना विजेचा मोठा झटका बसला. क्षणार्धात त्या जागीच गतप्राण झाल्या. यावेळी मोठा आवाज झाल्याने आकांक्षाचा पती राहुल व त्याची दोन लहान मुले बघायला आले. याच दरम्यान गच्चीवरील पाण्याची टाकी देखील फुटल्याने गच्चीत पाणी साचले होते.
राहुल आणि त्यांच्या दोन मुलांनादेखील विजेचा झटका बसल्याने ते दूर फेकले गेल्यामुळे बालबाल बचावले. रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली. पण, गच्चीतील पाण्यामुळे पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता. ही माहिती वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्यानंतर स्थानिकांनी या मायलेकीचे मृतदेह घटनास्थळावरून उचलले.
ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचे पंचनामे केले. सायंकाळी येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात मायलेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.
मुलाचाही झाला अपघात !
आई आणि बहिणीला विजेचा धक्का लागल्याची माहिती अभिषेक सोनवणे याला कळवण्यात आली. त्यावेळी अभिषेक हा नाशिक येथे होता. तो दुचाकीवरून आपल्या घरी येत असताना त्याचाही अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.