मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज (ता. ३१) मार्च झालेल्या मंत्रीमंड बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आंबेडकर जयंतीला मिरवणुका काढता येणार आहेत. तसेच रमजानही उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मास्क वापरणं ऐच्छिक
सर्व निर्बंध हटवण्यात आले असून त्यात मास्क मुक्तीचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. मास्क वापरणं हे ऐच्छिक असणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक अद्याप सुरू आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारकडून अधिकृतपणे पत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे निर्बंध उद्यापासून हटवण्यात येणार आहेत. उद्यापासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने 2 एप्रिल 2022 रोजी येणारा गुढीपाडवा यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.