फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर शहरात पित्याने सहा वर्षीय मुलाचा खून करून स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार बापाने आपल्या चिमुकल्याला सोबतच गळफास दिल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच असून विवऱ्यात एकाचवेळी पिता-पुत्राची निघाली अंत्ययात्रा निघालाच्या विदारक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
दोघांच्या मृत्यूमध्ये सुमारे ५ ते १० मिनिटांचे अंतर
नीलेश घनश्याम बखाल (वय ३३) असे पित्याचे, तर आर्यन बखाल (वय ६) असे दोघं मयत बाप लेकाचे नाव आहे. यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, मयत नीलेश यांनी मुलाचा गळा दाबल्याचे दिसून येत नाही. नायलॉनच्या दोरीने फंदे बनवून त्यांनी स्वत:सोबतच मुलाला देखील गळफास दिला असावा. तसेच दोघांच्या मृत्यूमध्ये सुमारे ५ ते १० मिनिटांचे अंतर असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. बालकाने विरोध केला अशा खुणा शरीरावर नाही. तसेच नीलेशने कुठलीही नशा केल्याचे देखील निदर्शनास आले नाही.
सुसाईड नोटमधून आली हृद्य पीळवून टाकणारी माहिती
मृत्यूपूर्वी नीलेश बखाल यांनी सुसाइड नोट लिहून ‘आत्महत्येसंदर्भात कोणाला दोष देऊ नका. मी आर्यनला सोबत नेत आहे’ असे म्हटले आहे. तसेच ‘बाबा मी डेअरी, चहाची हॉटेल अन् पोल्ट्रीच्या व्यवसायात खूप व्यस्त आहे, वेळच मिळत नाही. आम्ही आनंदी आहोत, तुम्ही चिंता करू नका, पुढच्या आठवड्यात विवऱ्याला येतो, असे नीलेश वडिलांशी भ्रमणध्वनीवरून बोलला. त्यानंतर तासाभरातच मुलगा अन् नातवाच्या मृत्यूची बातमी विवऱ्यात धडकल्याने वडील घनश्याम बखाल यांची शुद्धच हरपली.