पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबभाऊ पाटील हे नाव कुणाला माहित नाही, असा माणूस खान्देशात शोधूनही सापडणार नाही. बघता बघता हे नाव महाराष्ट्र व्यापी झालं आहे. खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातील पाळधी, ह्या एका छोट्या खेड्यातून, ज्यांच्या नेतृत्वाचा उदय झाला, ते भाऊ बघता बघता जिल्हा पादक्रांत करत, खान्देश आणि राज्याच्या पटलावर कोणत्या न कोणत्या कारणाने, दैदीप्यमान होवून तेजाळत आहेत. तेव्हा, त्यांना आयुष्याची सोबत करत असणाऱ्या, त्यांच्या सौभाग्यवती सौ. मायावहिनी, या मात्र पडद्याआड राहून, शिवसेनेचं मांगल्य बनून, त्यांची शक्ती होत, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. घर, शिवसैनिकांचा वावर समर्थपणे सांभाळत आहेत.
सध्याच्या काळात पती-पत्नी यांचा एकत्रित राजकारणातला वावर, हा गृहीतच धरला जातो. कधी ती गरज असते. तर, कधी मजबुरी. कधी तो सोस असतो. तर, कधी हव्यास. मात्र, भाऊंनी या बाबतीत कधीही हव्यास केला नाही. स्वतः ग्रामपंचायत, पंस, जिप, आमदारकी आणि आता मंत्रीपद भुषवितांनाही सौ. मायावहिनींना उगीचच सोबत मिरवले नाही. पदांच्या शर्यतीत घुसडले नाही, की सत्तेचा सारीपाटात प्यादे म्हणून उभं केलं नाही. संत्तेचा दोर आपल्याच हाती रहावा म्हणून, पत्नीला जागा अडवायला लावले नाही. यात भाऊंची भूमिका जितकी महत्वाची आहे, तितकीच किंवा त्याहून काकणभर वरचढ अशी, समंजस भूमिका सौ. मायावहिनींची राहिली आहे. पतीसोबत मिरवून घेणं, त्यांनी स्वतः कटाक्षानं टाळलं. पडद्याआड राहणं हे त्यांच्यावर, लादलेलं नाही. तर, तुळशी सारखं, घराचं मांगल्य राखणं, हे त्यांनी स्वतःहून स्विकारलेलं आहे. घराची आघाडी त्या समर्थपणे सांभाळत आहेत. म्हणूनच, भाऊ बाहेर, निडर वाघाची डरकाळी फोडू शकतात. ताठ मानेने समाजासमोर जावू शकतात.
आज भाऊंकडे पद, पैसा प्रतिष्ठा, गाड्या, बंगले यांची रेलचेल आहे. मात्र, शिवसेनेचा जिल्हास्तरीय नेता म्हणून, जेव्हा ते जिल्ह्यात फिरत होते, तेव्हा त्यांच्या सोबतच्या शिवसैनिकांसाठी, मायावहिनींचा रसोडा, म्हणजे अन्नपूर्णेचं अन्नछत्र बनले होते. घरी येणारा कोणताही शिवसैनिक, उपाशीपोटी जात नव्हता. या माऊलीचा आपुलकीचा स्वभाव, गोड वाणी आणि विनम्र वागण्यामुळेच, भाऊंशी शिवसैनिकांची नाळ जुळत गेली. घट्ट होत गेली. त्यांनी घरी येणाऱ्या शिवसैनिकांचा कधी तिटकारा केला नाही, की कधी अपेक्षाभंगही केला नाही. त्या काळी मातीच्या घरात राहणाऱ्या भाऊंची श्रीमंती जपण्याचं काम, मायावहिनींनी केले. त्या भाऊ – घर आणि शिवसैनिक यांच्यातला दुवा बनल्या. घरात दोन सासू, सासरे, दिर, जेठ, नंदा, भाचे, भाची, तीन मुलं या सर्वांना जीव लावणे, निखळ प्रेम करणे, नात्याच्या बंधाने बांधून ठेवणे, म्हणजे तारेवरची कसरत. ती मायावहिनींनी निष्ठेने केली. घरात खाणारी इतकी तोंडे असतांना, शिवसैनिकांनाही कधी भुकेले जावू दिले नाही, याचं मला सदैव कौतूक आणि अप्रुप वाटत राही. एव्हढं सारं करुनही, वहिनींनी यश कधीही आपल्या पदरात घेतले नाही. ते भाऊंच्या शिरावरच फेटा बनून दिमाखात मिरत राहिले. भाऊ कितीही कर्तृत्ववान असले, तरी मायावहिनींचं कर्तृत्व त्यांच्यापेक्षा सरस आहे, असं मला वाटतं. कमळाच्या पानावर कधी पाण्याच्या थेंब टिकत नाही. तसं त्यांनी आपल्या मनात सत्तेचं, प्रदर्शनाचा मोह चिटकू दिला नाही.
आज सामान्य नगरसेवक असो, की पक्षाचा नेता. सत्तेत आला म्हणजे त्याची पत्नी त्याच्यासोबत राजकारणात सक्रिय होते. यात चुकीचे काही आहे, असे ही नाही. मात्र, मायावहिनींनी ते निर्मोहीपणे, कटाक्षाने नाकारले. टाळले. भाऊ घरात नसतांना त्यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. घराची आघाडी सांभाळली. मुलांना शिकवलं. त्यांना त्यांच्या पायांवर उभं केलं. त्यांची लग्न केली. प्रताप आज राजकारणात स्थिरावला आहे. जिप सदस्य म्हणून बापाच्या पावलावर पाऊल टाकत, स्वतःची कारकीर्द घडवत आहे, प्रतिमा तयार करत आहे. विकी इंजिनिअर आहे. मुलीचं लग्न होवून, ती सुसंस्कृतपणे तिचं सासर सांभाळत आहे. हा सारा संस्कार, मायावहिनींनीच केला आहे. भाऊंना समाजसेवेचा आणि राजकारणाचा संसार चालवतांना, घरात वेळ देणं तसंही शक्यच नव्हतं. ती भूमिका सौ. मायावहिनींनी समर्थपणे सांभाळली आहे. जे कठिणच नव्हे, तर अग्निदिव्य आहे. म्हणूनच कौतुकास्पद आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे, एक समंजस, सोशिक, सुसंस्कारी स्त्री असते, असं म्हणतात. ती स्त्री मला सौ. मायावहिनींमध्ये दिसून येते. आज भाऊ एका संघर्षातून जात आहेत. अश्यावेळी मनाची घालमेल होते. मन अस्वस्थ होतं. निर्णय प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकते. आपलीच माणसं आपले वैरी होतात. तेव्हा एक समर्थ खांदा मान टेकायला लागतो. एक खंबीर मन सावरायला लागतं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ! असं म्हणणार कुणीतरी लागतं. ती भूमिका देखील मायावहिनींच निभावत असतील, याची मला खात्री आहे. मायावहिनी भाऊंसाठी विश्वासाचं अढळ स्थान आणि मनः शांतीचा एक शांत कोपरा आहेत. त्यांच्यातला हा समन्वयाचा बंध अधिकाधीक दृढ व्हावा. त्यांच्या नात्याला नवी झळाळी यावी. यशाचे अनेक धुमारे, त्यांनी बघावेत. हीच शुभेच्छा.
आज वाढदिवसानिमित्ताने मी मायावहिनींना आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो !
भावी आयुष्यात त्यांना दिर्घायुरारोग्य लाभो या सदिच्छा.
भरत चौधरी (संपादक, शौर्य मराठी वृत्तवाहिनी, जळगाव, मो.74989 49201)














