अबूधाबी (वृत्तसंस्था) तालिबान काबुलमध्ये शिरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पलायन केले. यानंतर जगासमोर येत अशरफ घनी यांनी स्पष्टीकरण देत अफगाणिस्तान सोडले नसते, तर प्राणाला मुकावं लागलं असतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय. तसेच माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
चार गाड्या भरुन पैसे सोबत घेऊन गेल्याचे आरोप खोडून काढताना घनी यांनी कशा परिस्थितीत आपण देशातून पलायन केलं याबद्दल भाष्य केलं. “मी एवढ्या तातडीने देश सोडला की मला माझ्या सिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असा दावा घनी यांनी केलाय. फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घनी यांनी आपण देशामध्येच थांबलो असतो तर आपली हत्या झाली असती अशी भीती व्यक्त केलीय. “मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” असं घनी यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. मोहम्मद नजीबुल्लाह या अफगाणी राष्ट्राध्यक्षाला तालिबानने २७ सप्टेंबर १९९६ रोजी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह काबूलमधील राजवाड्यासमोरच्या सिग्नलवर लटकवण्यात आलेला.
तालिबानने रविवारी सायंकाळी देशाची राजधानी काबूलमध्ये कब्जा मिळवल्यानंतर घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे घनी म्हणाले आहेत. तसेच देशात सध्या सुरु असणाऱ्या राजकीय चर्चांना आपला पाठिंबा असल्याचंही घनी यांनी म्हटलं आहे. “सध्या देशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा आहे. आता अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माझी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी होणं गरजेचं आहे,” असं घनी म्हणालेत.