औरंगाबाद (वृत्तसंस्था) अजान सुरू असताना गाणी त्या दिशेने भोंगा लावत त्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी लावल्यामुळे सुरक्षा दलातील फौजदारावर गुन्हा नोंदवला आहे.
देशभरात भोंग्यावरून राजकारण तापलेले असतानाच सातारा परिसरात एका मशिदीत नमाजाचे पठण होत असताना त्या दिशेने भोंगा लावत त्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी सामाजिक शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत रविवारी सायंकाळी गुन्हा नोंदविला. ही घटना शनिवारी सायंकाळी सिल्क मिल्क कॉलनीत घडली.
रेल्वे सुरक्षा दलातील फोजदार किशोर मलकूनाईक हे सध्या परळी येथे कार्यरत आहेत. शनिवारी नमाजच्या वेळी त्यांनी समोरच्या इमारतीमधून मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी लावली. पोलिसांना ही बाब समजताच जबाबदार पदावर असतानाही दोन धर्मात शत्रुत्व वाढेल आणि एकोप्यास बाधा होईल, सार्वजनिक शांतता भंग होऊन लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे कृत्य केले म्हणून फोजदार मलकूनाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
















