जळगाव (प्रतिनिधी) : भाजपचे खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ७ ते ८ यावेळेत दधिची चौकात भव्य सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती होणार आहे, अशी माहिती महाराणा प्रताप गणेश मंडळाचे अध्यक्ष कल्पेश सोनवणे व ज्येष्ठ सदस्य कैलास सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कैलास सोनवणे यांनी सांगितले की, महाराणा प्रताप मंडळास ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. मंडळाकडून गणेशोत्सवात धार्मिक देखावा करण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत काशी, सोरटी सोमनाथ, राम मंदिर, श्री कृष्णाचे विराट रूपदर्शन असे देखावे सादर केले आहे. यंदा मंडळाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुतीचा देखावा करण्यात आला आहे. देखावा हनुमानाचा असल्याने खासदार नवनीत राणा या मंडळात आरतीसाठी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मंडळासमोर सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. या ठिकाणी भगव्या साड्या परिधान करून बहुसंख्य महिला देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच मुस्लिमबांधवही उपस्थित राहणार आहेत. सामूहिक हनुमान पठणासाठी आठ ते दहा हजारांवर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नववीत राणा या जीपमधून मिरवणुकीतून मंडळाच्या जागेवर येतील. त्यांच्या हस्ते आरती होऊन हनुमान चालिसा पठण होईल, अशी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला सार्वजनिक महामंडळाचे अमित भाटिया, सोमनाथ व्यास, सुरेश सोनवणे, मोरेश्वर मंडोरा, नितीन शर्मा उपस्थित होते.