नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसमधून बाहेर पडलेले गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पटेल हे २ जून रोजी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुजरातचे नेते हार्दिक पटेल लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाची आता तारीखही ठरली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, तसंच नेतृत्व कामापेक्षा वरिष्ठांची मर्जी जपण्यात, कृती न करता सरकारच्या धोरणावर टीका करण्यातच धन्यता मानतात, असं म्हटलं होतं. हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा त्यांनी राजीनामा दिल्यापासूनच सुरू होत्या. मात्र त्याबद्दल अद्याप कोणी काही ठोस माहिती दिलेली नव्हती. पण आता स्वतः हार्दिक पटेल यांनीच या गोष्टीची पुष्टी केली आहे. हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कामाची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली होती. वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजी आणि त्यांचा राजीनामा काँग्रेसला महागात पडणार आहे.