सिल्लोड (वृत्तसंस्था) ‘पैसे डबल करून देतो’ असे सांगत विश्वास संपादन करीत डॉक्टरच्या हातातील ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व २ हजार रुपये रोख असा एकूण ३२ हजार रुपयाचा मुददेमाल लंपास करणाऱ्या दोन संशयित भोंदू बाबांना अटक करण्यात आली आहे.
सिल्लोड शहरातील सराफा मार्केट येथील सोनार मुलांचे हॉस्पिटल येथे शुक्रवार दि. २९ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील डॉक्टरांना गग्गी नाथ सोकी नाथ (वय १९), अरदन नाथ साद नाथ (वय २६ वर्ष , दोघे रा. बदौर ता. तपा जि. बरनाला राज्य-पंजाब ) या दोघांनी तुम्हाला पैसे डबल करून देतो असे म्हणत विश्वास संपादन केला. यानंतर त्यांनी डॉक्टराकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व दोन हजार रुपये रोख असा एकून ३२ हजार रुपयाचा माल लंपास केला.
याप्रकरणी सोनार हॉस्पिटलचे कर्मचारी सचिन खंडागळे यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.
















