लातूर (वृत्तसंस्था) आईला सतत मारझोड करणाऱ्या वडिलांचा पोटच्याच मुलाने चाकूने भोसकून, सपासप वार करत खून केल्याची खळबळजनक घटना लातुरातील रेणुका नगरात घडली. सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय 48 वर्षे), असे मयत बापाचे नाव आहे.
लातुरातील आंबाजोगाई रोडवरील आंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुका नगरात जानकर यांच्या घरी भाड्याने क्षीरसागर कुटुंब राहत होते. पत्नी मंगल क्षीरसागर (वय ४३) यांना पती सोमनाथ मधुकर क्षीरसागर हा सतत मारझोड करीत होता. शनिवारी त्याने पत्नीला पुन्हा मारहाण करायला सुरूवात केली. यावेळी मुलगा रोहित (वय २३) हा घरातच होता. आईला बापाकडून सतत होणाऱ्या मारझोडीमुळे कमालीचा संतापलेला होता. मारहाण सुरू असताना त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील ऐकत नसल्यामुळे रोहितचाही राग अनावर झाला आणि त्याने घरातील चाकू हातात घेत वडिलांना भोसकले. आई मंगल यांनी मुलाला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या अपयशी ठरल्या. तर पोटात आणि छातीवर सपासप वार केल्यामुळे सोमनाथ क्षीरसागर हे जमिनीवर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हत्येनंतर रोहितने घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. तर दुसरीकडे मंगल यांचा आक्रोश ऐकून ऐकून शेजारीही धावले. परंतू तोपर्यंत उशीर झालेला होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगल क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा रोहित क्षीरसागर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.