बीड (वृत्तसंस्था) सासरच्या लोकांनी लग्नात काहीच दिले नाही म्हणून पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर वार करून तिचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मयत विवाहितेच्या पतीला अटक केली आहे.
भाटवडगाव येथे अनंत भागवत सुगडे हा कुटुंबासह राहत असून त्याचा विवाह प्रतिभा सुगडे हिच्याशी २०१४ मध्ये झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन मुलं झाली. प्रतिभाला तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही म्हणून अनंत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. गुरुवारी पहाटे पाच वाजता अनंत याने पत्नीस मारहाण करून धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले.
या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारार्थ प्रतिभाला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान प्रतिभा हिचा मृत्यू झाला. मृत प्रतिभाचा भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित यांच्या तक्रारीवरून अनंत भागवत सुगडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. दाभाडे करत आहेत.