पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या हिवरखेडा येथे शेतातील तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.३रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
योगेश अशोक पाटील (वय २४) नेहमीप्रमाणे आपल्या गावालगत असलेल्या केळीच्या शेतात गेले असता त्यांना वायर तुटलेली आढळली तुटलेली वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांनी जोरात किंकाळी ठोकली अन् ते जमीनीवर कोसळले. त्यांच्या त्या आवाजाने बाजूलाच क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांनी सदर घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत योगेश अशोक पाटील यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी यांनी उपचारांती त्यांना मृत घोषित केले.
सध्या अवकाळी पावसाने शेत शिवारातील कामे तशी बंदच आहेत. परंतु शेताकडे जाऊन येतो असे म्हणून योगेश आपल्या आई-वडिलांना घरून सांगून निघाला, मात्र शेतातील तुटलेली वायर जोडण्याच्या प्रयत्नात त्याच्या जीवनाचीच तार तुटली. शेतकरी अशोक रामचंद्र पाटील यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा होता. मुलाचा मृतदेह बघताच आईने काळीज चिरणारा आक्रोश केला. दरम्यान, रविवारी दुपारी योगेश शेतात जाण्यासाठी निघाला. आईने त्याला हटकले व मीही तुझ्यासोबत येते. तू एकटा जाऊ नको, असे आईने त्याला सांगितले. पण, योगेशने आईला सोबत येण्यास नकार दिला आणि शेताकडे निघून गेला, तो घराकडे परतलाच नाही.