अमरावती (वृत्तसंस्था) अचानक पाऊस सुरु झाल्यानंतर पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आडोसा धरला. मात्र, तिथेच घात झाला आणि वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू तर दोघं जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दर्यापूर तालुक्यातील लासूर येथे घडली. महुराज चंदू खडे (वय ४२, रा. रामतीर्थ असे मृतकाचे नाव आहे.
दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील दिनेश राऊत या शेतकऱ्याच्या शेतात पिकांना खत देण्यासाठी रोजंदारीवर काही मजूर गेले होते. शनिवारी दुपारी अचानक पाऊस सुरू झाला. या पावसामुळे एक मजूर झाडाच्या आश्रयाला गेला; मात्र त्याचवेळी वीज पडून घटनास्थळीच मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली. महुराज खडे या मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत काम करणारे सुरेश लोणकर (४५) रा. रामागड व चंद्रशेखर अभ्यंकर (५०, रा. लासूर) हे दोघे मजूर जखमी झाले आहेत.
महुराज खडे हे इतर मजुरांसोब लासूर शेतशिवारातील दिनेश राऊत या शेतकऱ्याच्या शेतात पिकांना खत देण्यासाठी रोजंदारीने मजूर म्हणून गेले होते. दुपारी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी शेतातील झाडाखाली पाण्यापासून बचाव होण्यासाठी आश्रय घेतला. नेमकी त्याचवेळी कडकडाटासह वीज पडून महुराज खडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेल्या दोघांच्या पायांना गंभीर इजा झाली. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर या ठिकाणी दाखल करण्यात आले होते.