धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथील एका लग्नात वऱ्हाडींना फेटे बांधून घरी चोपडा येथे जात असतांना तालुक्यातील पिंपळे फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. महेंद्र हिलाल चित्ते (वय ४०, रा. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत महेंद्र चित्ते हा एरंडोल येथे लग्नात फेटे बांधण्यासाठी गेला होता. लग्न आटोपून चोपड्याकडे जाताना धरणगाव नजीकच्या पिंपळे निशाणी जिनिंग जवळ दुचाकी (एमएच- १९, एडब्ल्यू- ४६९८)वरुन जाताना चोपड्याकडून समोरुन येणाऱ्या पाळधी येथील पवन कैलास कोळी याची दुचाकी (एमएच – १९, डीटी- ९५८९ ) ची जबर धडक झाली. या अपघातात महेंद्र चित्ते यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणी मृताचे नातेवाइक वासुदेव चित्ते यांच्या माहितीवरुन धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.