औरंगाबाद वृत्तसंस्था) सासूबाई, आता मुलाचे दुसरे लग्न करताना त्या मुलीला तरी फसवू नका, असा मेसेज पाठवून एका २४ वर्षीय विवाहितेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला रेल्वेतून फेकत आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात घडली.
पूनम गणेश विसपुते असं त्या विवाहितेचे नाव आहे. पती आणि सासूच्या छळाला कंटाळलेल्या पूनमने रेल्वेने जात असताना शांभवी या तीन वर्षांच्या चिमुकलीला रेल्वेतून बाहेर फेकून स्वतःही रेल्वेतून उडी मारली. उडी मारण्यापूर्वी तिने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,’ असे म्हटले आहे. नाथनगरात माहेर असलेल्या पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश गुजरातमधील नवसारी येथील एका कंपनीत कामाला आहे. सासरच्या छळाला कंटाळून ती सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. मात्र, तत्पूर्वीच पूनम शंभवीला घेऊन घराबाहेर पडली होती. तिची शोधाशोध सुरू असतानाच लासूर स्टेशन-पोटूळ रेल्वे स्टेशनदरम्यान एक महिला, मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.