चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे घडली. सुमित्रा काशिनाथ मोहुर्ले (६०) असे या महिलेचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुमित्रा शुक्रवारी सकाळी शेतावर गेल्या होत्या. काम करीत असताना त्यांना सापाने दंश केला. सापाने दंश केल्याचे लक्षात येताच त्या लागलीच गावात आल्या आणि झालेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. सरपंच गणेश गड्डमवार यांनी आपल्या वाहनाने नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता सुमित्रा मोहुर्ले यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.