नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमधील एका क्षुल्लक कारणावरुन दोन भावांचा खून (murder) करण्यात आला आहे. हत्येचा हा थरार नांदेड शहरातील देगाव चाळ भागात घडला. हत्येच्या घटनेमागील कारण अगदीच क्षुल्लक असं आहे. घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरुन भावकीमध्ये वाद झाला. हा वाद प्रचंड विकोपाला गेला.
घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरुन भावकीमध्ये वाद झाला. कधी एकेकाळी सुख-दु:खामध्ये सहभागी झालेले भावकीतील माणसंच एकमेकांना गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागली. वाद इतका विकोपाला गेला की गोष्ट हाणामारीवर पोहोचली. विशेष म्हणजे ही हाणामारी फक्त लाथा-बु्क्यांपर्यंत मर्यादित राहिली नाही. हाणामारीत थेट चाकू आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला.
धारदार शस्त्र आणि चाकू वार करून दोन सख्या भावांची हत्या
देगाव चाळीतला हा थरार वाढतच जात होता. धारदार शस्त्र आणि चाकूचा वापर केल्याने या हाणामारीत दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली. आरोपींनी चाकूने मृतक भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. प्रफुल्ल राजभोज (वय ३५), संतोष राजभोज (वय ३३) अशी मृतक भावांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या चाकूच्या वारमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कचरा टाकण्यावरुन झाला वाद
कचरा टाकण्यावरुन सुरु झालेला हा वाद अखेर दोन जणाच्या खुनाने मिटला. दोन जणांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. संपूर्ण नांदेड शहरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटना समजून घेतली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सात आरोपींविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर चार जण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास वजिराबाद पोलिसांकडून सुरु आहे.