बीड (वृत्तसंस्था) मोठ्या बहिणी सोबत तलावावर गेलेल्या लहान भावाचा व सोबत आलेल्या शेजारच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. रोहित परमेश्वर चव्हाण (वय १७) व अश्विनी लहू जाधव (वय १० ) असे मयत मुलांची नावे आहेत.
अंबा कारखाना येथे राहणारा रोहित परमश्वर चव्हाण हा मुलगा आपल्या बहिणीसोबत कपडे धुण्यासाठी अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील तलावावर गेले होते. यावेळी त्याच्या घराच्या शेजारी राहणारी अश्विनी लहू जाधव ही दहा वर्षाची मुलगी सोबत गेली होती.
तलावात कपडे धुत असतांना अश्विनी ही खोल पाण्यात जाऊन बुडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी रोहित चव्हाण हा खोल पाण्यात गेला. परंतु खोल पाण्याचा अंदाज येऊ न शकल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तरुणांनी या दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. काही दिवसांवर दसरा सण आल्याने धुणे धुण्यासाठी सर्व जण तलावावर गेले होते.