नागपूर (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये (state) उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. तापमानामध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. यातच आता पुढील ५ दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरांचे तापमान 43 ते 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सासत्याने तापमानात होणारी वाढ पाहता सूर्याचा UV इंडेक्स धोकादायक पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचं टाळावं. तसेच दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. अतिनील किरणांमुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी चारच्या दरम्यान वातावरणात अतिनील किरणे अतितीव्र असतात. त्यामुळे दरम्यानच्या काळात बाहेर जाणं टाळावं. ही अतिनील किरणे मानवी शरीरासाठी अत्यंत जोखमीचे असू शकतात.
हवामान खात्याने आज अहमदनगर, बुलडाणा, अकोला आणि नागपूर या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज येथील कमाल तापमानाची तीव्रता अधिक राहणार असून उष्णतेची लाट येणार आहे. सकाळपासूनच याठिकाणी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज कोरडं हवामान राहणार असून वातावरणात उन्हाच्या ज्वाळा अधिक असणार आहे. उद्यापासून महाराष्ट्रात आणखी दाहकता वाढणार आहे.
या अकरा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
उद्या जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून येथील कमाल तापमान 43 ते 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अगदी फेब्रुवारीपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यानंतर अचानक उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पुढील पाच दिवस मराठवाड्यासह, विदर्भ, लगतचा उत्तर महाराष्ट्र परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
















