नाशिक (वृत्तसंस्था) मुंबईसह राज्याच्या विविध भागात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही जोर धरला आहे. मुंबईत पावसाची कोसळधार कायम असून, अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले. तर दुसरीकडे संततधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे रेल्वे रुळांचं प्रचंड नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी रुळांवर कमरेइतकं पाणी साचलं. त्यामुळे टिटवाळा ते इगतपुर दरम्यानची प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीप्रमाणे कसारा घाटात संततधार पाऊस सुरू असल्याने रेल्वे रुळावर दरड कोसळली. यात रुळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.
कोणकोणत्या ट्रेन्स रद्द?
सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
दरम्यान, टिटवाळा-इगतपुरी तसेच अंबरनाथ-लोणावळा या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मुसळधार पावसामुळे या मार्गावर पाणी साचले आहे. तर अंबरनाथ ते सीएसएमटी, टिटवाळा ते सीएसएमटी या रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सध्या सुरु आहे. तर पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरु आहे.