मुंबई (वृत्तसंस्था) हिवाळ्यात ऐन थंडीतही अवकाळी पावसाचं आगमन सुरुच होतं. अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात अनेक बदल पहायला मिळाले. आता हळूहळू थंडी कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. येत्या चोवीस तासांत दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे काही ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूरसह, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील ४ दिवसात वायव्येकडील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता. पुढील ४-५ दिवसांत मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं वर्तवलं आहे.
गारपीटमुळे आधीच बागायतदार आणि खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.