पुणे (प्रतिनिधी) राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. दरम्यान पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे तरुण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून चालले होते. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. तरुणांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने कहर केला. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केल्याने सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ते बंद झाले. कात्रज तलाव तुडुंब भरून वाहिल्याने आंबिल ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ झाली. गतवर्षी २५ सप्टेंबरला याच ओढय़ाच्या पुरामुळे दक्षिण पुण्यात हाहाकार उडाला होता. त्यामुळे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारांनी नागरिकांमध्ये धडकी भरली होती. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
दरम्यान, वसाहतींमध्ये शिरलेले पाणी काढण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं. पुणे शहर आणि जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.