पुणे (वृत्तसंस्था) राज्यात मान्सून सक्रिय असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवारी a अनेक भागांत दमदार पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. मान्सूनची वाटचाल कायम असून शुक्रवारी अनेक भागांत मान्सून पोचला. संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला. तर राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला. दरम्यान, पुढील चार दिवस विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
राज्यात शुक्रवारी कोकण भागातील रत्नागिरी येथे ५७ मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच अलिबाग २८, सांताक्रुझ २८ तसेच मुंबई येथे २१ मि.मी. पाऊस पडला. विदर्भातील गोंदिया येथे ५७ मि.मी. इतका मुसळधार पाऊस पडला. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथेही पाऊस पडला.
येत्या २९ जून ते २ जुलैदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज व यलो अलर्ट असून, बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान जळगाव येथे ३३.८ अंश सेल्सिअस इतके होते.