मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात आज जोरदार खडाजंगी झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ओबीसींच्या संदर्भात सर्वपक्षीय आणि काही संघटनांसह आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी इतर मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील ओबीसी कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडला. छगन भुजबळ यांनी मंत्रालयात ओबीसी कर्मचाऱ्यांसाठी फक्त 8 टक्के आरक्षण असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी आकडेवारीही सादर केली. जर ओबीसींसाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या तितक्या भरल्या गेल्या नाहीत. उलट खुल्या प्रवर्गातून जास्त प्रमाणात भरती करण्यात आली आहे.’ त्यामुळे जर खुल्या प्रवर्गासाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या सव्वा सहा लाख कशा भरल्या गेल्या, असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
यावर अजित पवारांनी थेट आक्षेप घेतला. ही माहिती साफ चुकीची आहे. ही माहिती खरी असेल तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावे, असं अजित पवार बैठकीत म्हणाले. यानंतर पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बैठकीत काही क्षणासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं, असेही कळते. दरम्यान ओबीसीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते आपापसात भिडल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
















