छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) हसूल कारागृह परिसरातील कर्मचारी निवासस्थानाजवळ असलेल्या मैदानात कारागृह पोलीस कर्मचाऱ्याचा लाकडी दांड्याने डोके व चेहरा ठेचून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (४२, हसूल कारागृह कर्मचारी निवासस्थान), असे खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर सचिन भगवान दाभाडे (३६, रा. चेतनानगर) हा त्यांचा मित्र जखमी आहे. आरोपी अनिल नितीन कसबे (२४ रा. तक्षशिलनगर, जटवाडा) याने दोघांना मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
मोकळ्या मैदानात बसले होते दारू प्यायला !
कारागृह पोलीस सिद्धार्थ जाधव आणि सचिन दाभाडे हे रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दारू पार्सल घेऊन कारागृहाच्या बाहेर मोकळ्या मैदानावर जावून बसले. त्या ठिकाणी अगोदरच अनिल नितीन कसबे हा तक्षशिलनगरचा तरुणासोबत दारू पित बसलेला होता. हे दोघेजण जाऊन त्या दोघांच्याजवळ दारू पित बसले. सिद्धार्थ आणि सचिन हे गप्पा मारत असताना साधारण १० वाजेच्या सुमारास अनिल व सिद्धार्थ यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. वादात सिद्धार्थ यांनी अनिलच्या नात्यातील एका महिलेबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. अनिलला त्याचा प्रचंड राग आला. तो घरी निघून गेला. १२ वाजेच्या सुमारास सिद्धार्थ व सचिन कारागृहाच्या भिंतीकडे तोंड करून बसलेले असताना अनिलने मागून लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. सिद्धार्थ क्षणार्धात कोसळले. सिद्धार्थला वाचविण्यासाठी सचिन दाभाडे मध्ये पडला. तर त्यालाही अनिल कसबे याने लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. त्यानंतर सचिनच्याही डोके, चेहऱ्यावर कान तुटेपर्यंत मारून निघून गेला.
संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात !
या घटनेनंतर अनिल कसबे त्या ठिकाणाहून पळून गेला. जखमी सचिन दाभाडे बचावासाठी त्याने पळ काढला, व जवळच असलेल्या मित्राचे घर गाठले. मित्राने त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती हर्सल पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि कारवाई सुरू केली. मयत सिद्धार्थ जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. ते कर्मचारी निवासस्थानात राहत होते. जाधव हे वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरीत लागले होते. या प्रकरणात पोलीस उपायुक्त नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांनी तांत्रिक तपास करून आरोपीला जटवाडा परिसरातून ताब्यात घेतले. अनिल नितीन कसबे असे आरोपीचे नाव असून त्या हा प्रकार दारूच्या नशेत केल्याची कबुली त्याने दिली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू मोरे, सहाय्यक फौजदार विश्वास शिंदे, पोलीस हवलदार देशमुख, पालवे, दहीफळे, गुंजाळ, तडवी यांनी सहकार्य केले.