नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासोबत लष्कर अधिकारी असे एकूण १४ जण प्रवास करत होते. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
एका वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकदेखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या. या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास होते. यामध्ये बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या. हवाई दलाने बिपिन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं हवाई दलाने सांगितलं आहे.