नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अभिनेते जॅकी श्रॉफ यांचे नाव, आवाज, छायाचित्र यांचा विनापरवानगी वापर करता येणार नाही. तसेच जॅकी, जग्गू दादा ही नावे तसेच या अभिनेत्याची ओळख असलेला ‘भिडू’ हा शब्द वापरण्यासदेखील न्यायालयाने बंदी घातली आहे.
जॅकी श्रॉफ यांनी उत्पादनांची विक्री, रिंगटोन, वॉलपेपर यासाठी आपले नाव, आवाज, छायाचित्राच्या दुरुपयोगाबाबत आक्षेप घेणारी एक याचिका १४ मे रोजी दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी काही संस्थांचा उल्लेख केला होता. या संस्थांकडून कॉफीचे मग, हस्ताक्षरीत पोस्टर्स, बॅग यांसारख्या वस्तू जॅकी श्रॉफ यांच्या नावाने विकण्यात येत असल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच काही मिम्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे छायाचित्र, व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. जॅकी श्रॉफ यांच्या आवाजाची नक्कल असलेल्या या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत, असे याचिकेत म्हटले होते. हा आपल्या व्यक्तिमत्त्व व प्रसिद्धीच्या अधिकाराचा दुरुपयोग असल्याचा जॅकी यांचा दावा होता. त्यांचा दावा न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने मान्य केला. जॅकी श्रॉफ यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा विनापरवानगी वापर करत काही संस्थांनी व्यावसायिक लाभ मिळवले आहेत. त्यांनी परवानगीशिवाय अभिनेत्याचे नाव, छायाचित्र, आवाजाचा वापर केला.
यामुळे जॅकी यांच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धीच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. आम्ही याप्रकरणी आदेश दिला नाही तर यामुळे याचिकाकर्त्याचे आर्थिक नुकसान होईल, तसेच सन्मानाने जगण्याच्या त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होईल, असे खंडपीठाने १५ मे रोजीच्या आपल्या अंतरिम आदेशात नमूद केले. न्यायालयाने याप्रकरणी काही संस्थांना नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये एक यूट्यूबर आणि ‘भिडू’ हा नोंदणीकृत ट्रेडमार्क वापरणारा एक रेस्टॉरंट मालक आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. न्यायालयाने दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाला संबंधित प्रकरणी आवश्यक निर्देश देण्याचा आदेश दिला.