जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सागर पार्क मैदानावर हायमास्ट लॅम्प बसविणे आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सागर पार्क मैदानाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर कामातील संरक्षक जाळी बसविण्याचे काम यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते. मैदानाच्या सुशोभीकरणासाठी नगरसेवक अनंत जोशी गेल्या साडेतीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. गुरुवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या हस्ते हायमास्ट लॅम्प बसविणे आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक अनंत जोशी आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण, स्वच्छतागृह होणार
मैदानावर जॉगिंग ट्रॅक तयार केल्यानंतर त्याठिकाणी वृक्षारोपण देखील केले जाणार असून त्यासाठी निधी देखील मंजूर आहे. तसेच मैदानावर बीओटी तत्वावर स्वच्छतागृह उभारण्यासाठी सुप्रीम कंपनीसोबत चर्चा सुरू असून लवकरच तो विषय देखील मार्गी लागणार असल्याचे नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले.