सांगली (वृत्तसंस्था) पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी केलं आहे.
“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती १८७ राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, १ अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं संभाजी भिडे म्हणाले.
कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी
भिडे यांनी पुन्हा एकदा कोरोनावर बोलताना चीनवर टीकेची झोड उठवली. कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. कोरोना थोतांड आहे असे भिडे म्हणाले.