मुंबई (वृत्तसंस्था) सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकने (Hindusthani Bhau Vikas Phatak) या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक केली आहे.
विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला ११ वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
आंदोलनानंतर काय म्हणाला होता विकास फाटक
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक म्हणाला होता की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं.”