हिंगोली (वृत्तसंस्था) दोन अज्ञात युवकांनी भरदिवसा हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर केलेल्या गोळीबारात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण जखमी झाले असून, , त्यांना प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. ही घटना मंगळवार (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर जिल्हा परिषद व एका खाजगी दवाखान्यासमोर मोठा जमाव जमला होता. आरोपी मात्र पलायन करण्यात यशस्वी झाले आहेत.
नेमकं काय घडलं !
भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण हे मंगळवारी (दि. १) काही कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये दुपारच्या सुमारास गेले होते. काम आटोपून ते इमारतीवरून खाली उतरल्यानंतर आपल्या कार (एमएच ३८ व्ही ४२१६) कडे होते. जात जाऊन दरवाजा कारजवळ उघडत असताना अज्ञात दोन युवकांनी सिनेस्टाईल येऊन त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी झाडल्यावर सावध झालेले चव्हाण पुन्हा खाली वाकले. मात्र, पुन्हा दोन गोळ्या झाडल्या गेल्या. यातील एक गोळी हुकली तर दुसरी गोळी खांद्याजवळून गेली, पण तिसरी गोळी मात्र त्यांच्या पाठीमागे लागली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घटनास्थळी एकच जमाव जमला.
प्रकृती गंभीर झाल्यामुळे नांदेड येथे हलवले !
यानंतर पप्पू चव्हाण यांनी त्याच अवस्थेत कार चालवत एक खासगी रुग्णालय गेले. जखमी अवस्थेत चव्हाण हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नांदेड येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह भाजपची मंडळी दाखल झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अज्ञात हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकही रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !
हिंगोली जिल्हा परिषदेसमोरच पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करणारे दोघे युवक कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्रव होते; परंतु चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलीस अधिक तपासाच्या कामाला लागले आहेत. गोळीबार करणारे हे तरुण असून दोन्ही हातात दोन पिस्टल त्या युवकांच्या हातात असावेत, असा अंदाज आहे.
पोलिसांनी घेतलं दोन संशयित आरोपींना ताब्यात !
या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. इतर तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.