मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे १७ फेब्रुवारी रोजी सीएसएमटीला जीपीओजवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे. यावेळी दोघांनीही दहा मिनिटे चर्चा केली. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. अशी माहिती सूत्रांनी सांगितली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुसख हिरेन सीएसटीला गेले होते. यादरम्यान १७ फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सीएसएमटीबाहेर सिग्नलजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं तिथे गाडी पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.
मनसुख हिरेन यांनी सीएसएमटीला ज्या ओला कॅबने प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान हिरेन यांना पाच वेळा फोन आला. वाझे यांनी हा फोन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आलं होतं. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे.
कोण आहेत मनसुख हिरेन?
मनसुख हिरेन यांनी जे प्रतिज्ञापत्र पोलीसात दाखल केलं आहे आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी जे वाचून दाखवलं त्यानुसार- मनसुख हिरेन हे ऑटोमोबाईलच्या स्पेअर पार्टचा व्यवसाय करत होते. तीन मुलं आणि पत्नीसह ते ठाण्यात रहात होते. पत्नीचं नाव विमला आहे. त्यांचं वय ४३ वर्षे. तीनही मुलांची वय हे १३ ते २० वर्षाच्या दरम्यान आहे. सध्याच्या ठिकाणी ते २००५ सालापासून रहात आहेत.
कोण आहेत सचिन वाझे?
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतले. सचिन वाझे हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे.