जळगाव (प्रतिनिधी) : इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषद जळगाव व व.वा.वाचनालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘इतिहास महाराष्ट्राचा : श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला उद्घाटनास व्यासपीठावर बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष व मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, व.वा.वाचनालयाच्या बालविभागाच्या प्रमुख डॉ.शिल्पा बेंडाळे, कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शहा, सदस्य अपर्णा भट, केंद्रीय संचार ब्युरोचे जळगाव प्रबंधक संतोष देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करुन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या स्टेशनरोडवरील सभागृहात बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेल्या या उपक्रमात १२ समूह संघ तर १६ एकल सादरीकरण करण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील व राजा रयतेचा या ऐतिहासिक महानाट्याचे निर्माते जयवर्धन नेवे यांनी केले.
‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमात समूह गटात सर्वोत्कृष्ट – नाट्यरंग थिएटर्स जळगाव, उत्कृष्ट – गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालय, जळगाव, उत्तम – स्वामी समर्थ विद्यालय आव्हाणे यांनी पारितोषिक पटकावले तर एकल गट १ (वय ५ ते १०) या गटात सर्वोत्कृष्ट – आराध्या पाटील, उत्कृष्ट हृदया चव्हाण, उत्तम – अनुश्री चौधरी, एकल गट २ (वय ११ ते १५) सर्वोत्कृष्ट – इशान भालेराव, उत्कृष्ट वैभवी बगाडे, उत्तम – संहिता जोशी, लक्षवेधी – श्रध्दा घ्यार व काव्या फेगडे यांनी पारितोषिके पटकावली. यातील सर्वोत्कृष्ट व उत्कृष्ट विजेत्यांना दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी यशवंत नाट्यसंकुल माटुंगा येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. पारितोषिक विजेत्यांना दिव्य कॉस्मेटिक्सतर्फे स्मृतिचिन्ह व ज्येष्ठ पत्रकार सुनिल पाटील यांच्यातर्फे रोख पारितोषिके देण्यात आली तर केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे उपस्थित बालकलावंतांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगावचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर – हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, पंकज बारी, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, नेहा पवार, दर्शन गुजराथी, सुरेखा मराठे व व.वा.वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतलेत.