मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्याचे आदेश आले आहेत.
समीर वानखेडे यांनी १९९७ मध्ये बारचा परवाना मिळवला होता. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. परंतु, समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन बारचा परवाना मिळवला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून समीर वानखेडे यांच्या बारचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. हा समीर वानखेडे यांच्यासाठी एनसीबीतील बदलीनंतरचा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
समीर वानखेडे यांना एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन हटवल्यानंतरही आपण त्यांच्याविरुद्धचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते. त्यावेळी नवाब मलिका यांनी समीर वानखेडे यांनी अवैधरित्या मिळवलेल्या बार आणि परमीट रुमचा परवान्याविषयी भाष्य केले होते. अल्पवयीन असताना समीर वानखेडे यांनी बार परमीट रुमचे लायसन्स घेतले होते. यूपीएससीत नोकरीत असताना स्वत:चा बार सुरु केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यामुळे आता ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केल्याने नवाब मलिकांनी आपला शब्द खरा करुन दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
















