जळगाव (प्रतिनिधी) बनावट ई-मेल आयडी तयार करून जामनेर येथील रहिवासी किराणा दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून महिलांची अंतर्वस्त्र मगविल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅश ऑन डिलिव्हरी स्वरूपातील मागवलेली ही अंतर्वस्त्र थेट दुकानदाराच्या घरीच येत असल्याने दुकानदार हैराण झाला आहे.
यासंदर्भात पिडीत दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जून २०२२ ते १३ जून २०२२ रोजी पर्यंत वेळोवेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून व स्वतःची ओळख लपवून दुकानदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर महिलांचे अंतर्वस्त्र ऑनलाईन ऑर्डर केले. तसेच सदरचे वस्तू कॅशऑन डिलिव्हरी मार्फत दुकानदाराच्या राहत्या पत्त्यावर पाठवीत आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.
















