चेन्नई (वृत्तसंस्था) हनिमूनसाठी बाली येथे गेलेल्या पूनमल्ली येथील नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा फोटोशूटदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाला. ‘वॉटर बाइक’ उलटल्याने ही दुर्घटना घडली. लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी मृतांची नावे आहेत. दोघांचा विवाह १ जून रोजी झाला होता.
पोंटामल्ली सेनिरकुप्पमजवळ राहणारी सेल्वम यांची मुलगी विबुष्णिया (वय २५) ही डॉक्टर आहे. विबुष्णिया आणि सालेम जिल्ह्यातील डॉक्टर लोकेश्वरन यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनीही त्यांच्या प्रेमाबाबत कुटुंबियांना सांगितल्यावर घरच्यांनीही लग्नाला होकार दिला. त्यानंतर, १ जून रोजी, विबुष्णिया आणि लोकेश्वरन यांचा पोंटामल्ली येथील एका लग्नमंडपात मोठ्या थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर नवविवाहित डॉक्टर जोडपं इंडोनेशियातील बाली येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते. बीचवर मोटर बोटमध्ये फोटोशूट करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि हे दोघेही बुडाले. शुक्रवारी लोकेश्वरन यांचा मृतदेह सापडला, तर शनिवारी सकाळी विबुष्णियाचा मृतदेह सापडला. विबुष्णियाचे वडील सेल्वम आणि नातेवाइकांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
स्पीड बोटीद्वारे समुद्रात फेरी हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात बंद करण्याचे दोघांनी ठरवले होते. मात्र, त्यांची ही मनीषा शोकांतिकेत रूपांतरित झाली. अचानक वॉटर बाइक उलटली आणि काही कळायच्या आत दोघे समुद्राच्या पाण्यात बुडाले. कुटुंबीय आता त्यांचे मृतदेह चेन्नईला परत आणण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, नवविवाहित जोडप्याच्या अकाली निधनाने त्यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.