
धुळे (प्रतिनिधी) – महावितरणच्या धुळे मंडळातर्फे ‘सन्मान सौदामिनींचा’ कार्यक्रमांतर्गत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फेटे घालून व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महावितरणमधील महिला अधिकारी, कर्मचारीही विजेसारख्या तांत्रिक व अत्यावश्यक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी काढले. कार्यालयीन कामकाजाचा भार सांभाळत अनेक महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कठीण प्रसंगांना तोंड देत महावितरणमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे अधीक्षक अभियंता सरग म्हणाले. यावेळी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महावितरणमध्ये काम करताना येणारे अनुभव कथन केले.
याबरोबरच सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वंयपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर (स्मार्ट) योजना, स्मार्ट मीटरचे फायदे, वीज बचत, वीज सुरक्षा, कॅपॅसिटर बसविणे, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. या प्रसंगी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















