साप्ताहिक राशिभविष्य, २९ मे ते ४ जून २०२२ : अनेक राशींसाठी जूनचा पहिला आठवडा लाभ आणि आनंद देणारा ठरेल. त्याच वेळी, काही लोकांना त्यांच्या खर्चाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मेष :
सप्ताहारंभीच्या अमावास्येच्या प्रभावक्षेत्राखाली भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी कौटुंबिक वाद टाळावेत. बाकी सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येनंतर आत्यंतिक प्रवाही राहील. आजचा रविवार व्यावसायिक वसुलीचा. ता. ३ व ४ हे दिवस घरात सुवार्तांचे, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचे.
वृषभ :
राशीतील अमावास्येचं फिल्ड रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील रुसव्या-फुगव्यांचं, शांत राहा. बाकी ता. २ ते ४ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मान-सन्मानाचा. मात्र, नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज टाळा. राजकारण नको. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी करताना जपा.
मिथुन :
सप्ताहात उधार-उसनवारी जपा. सट्टेबाजी टाळा. मित्रांशी वाद टाळा. बाकी सप्ताहाचा शेवट नोकरीत आनंदोत्सवाचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेत राहतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावास्येच्या काळातील प्रवासात जपावं, पैशांचं पाकीट जपा.
कर्क :
आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर खराब, नका काढू कुरापती. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या धनवर्षावाचा, व्यावसायिक वसुली. ता. ३ चा शुक्रवार मोठ्या दैवी प्रचितीचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल, देवदर्शनं होतील.
सिंह :
अमावास्येचं प्रभावक्षेत्र क्रिया-प्रतिक्रियांतून जपलंच पाहिजे. बाकी मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस शुभ ग्रहांच्या साथसंगतीचे. उत्तम व्यावसायिक उलाढाली. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी लाभ.
कन्या :
सप्ताहात स्त्रीवर्गाच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतात. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होणारी मंगळ-गुरू युती संमिश्र फळं देईल. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस गाठीभेटी यशस्वी करणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार होतील.
तूळ :
अमावास्येच्या पार्श्वभूमीवरील मंगळ-गुरू युतियोग हितशत्रुपीडेतून अस्वस्थ करू शकतो, भान ठेवा. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नव्या उपक्रमांचा शुभारंभ करून देईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या दंतव्यथेची. भावंडांशी मतभेद. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत ताण.
वृश्चिक :
मंगळ-गुरू योगाचं एक पॅकेज अस्तित्वात राहील. सप्ताह नोकरीत भाग्योदयाचाच. सप्ताह तरुणांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाराच. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ ते ४ हे दिवस वैयक्तिक हृद्य समारंभांचे. अमावास्येजवळ स्त्रीशी गैरसमज टाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी वेंधळेपणा टाळावा.
धनू :
सप्ताह बुद्धिजीवी मंडळींमध्ये आत्मविश्वास वाढवेल. कलाकारांना मोठ्या संधी प्राप्त होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ ते ३ हे दिवस शुभ घटनांतून फास्ट ट्रॅकचे. पूर्वाषाढा व्यक्तींना ता. २ चा गुरुवार गुरुप्रचितीचाच. घरात तरुणांची कार्यं ठरतील, काहींना मोठं स्पर्धात्मक यश. शनिवार विवाहयोगाचा.
मकर :
उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना छान बॅटिंग फिल्ड राहील, फक्त हातापायाच्या दुखापती सांभाळा. ता. ३ व ४ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या आदर-सत्कारांतून थक्क करतील. विवाहविषयक गाठीभेटींतून यश मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ खर्चाचे प्रसंग. वाहनपीडा.
कुंभ :
मंगळ-गुरू युतियोगाचं फिल्ड शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बौद्धिक उपक्रम यशस्वी करेल. कलाकारांना धनलाभ. सरकारी माध्यमांतून लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ जूनचा शुक्रवार मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील व्रात्य लहान बालकं जपावीत.
मीन :
अमावास्येजवळ वादग्रस्त गाठीभेटी टाळा. बाकी नंतर शुभ ग्रहांचंच फिल्ड क्रियाशील राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक मरगळ पूर्णपणे जाईल. सरकारी माध्यमांतून लाभ, पदस्थ व्यक्तींकडून लाभ. ता. २ ते ४ हे दिवस प्रचंड प्रवाही राहतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विवाहविषयक निर्णयाचा.