प्रयागराज (प्रतिनिधी) मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराजच्या महाकुंभात त्रिवेणी संगमावर मंगळवारी मध्यरात्री उसळलेल्या भाविकांच्या लोंढ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ३० जण मृत्युमुखी पडले, तर ६० जण गंभीरपणे जखमी झाले. घडलेल्या या दुर्घटनेमुळे अनेकांनी बळींच्या आकड्याबद्दल दावा केला आहे की मृतांचा आकडा ३० पेक्षा जास्त असू शकतो. चेंगराचेंगरीनंतरही संगमावर सुमारे ६ कोटी भाविकांनी स्नान केल्याचे सांगितले जात आहे. विरोधकांनी या दुर्घटनेसाठी भाजपला जबाबदार ठरवत टीका केली आहे.
महाकुंभाच्या मौनी अमावास्येच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने कोट्यवधी भाविक एक दिवस आधीच कुंभनगरीत दाखल झाले होते. ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नान करण्यासाठी तसेच नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक संगमाच्या टोकालगत आणि आखाडा मार्गावर बॅरिकेड्सलगत झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी घडली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, रात्री एक ते दोन वाजता संगमाच्या दिशेने जाणारे लोक आधीपासूनच झोपलेल्या भाविकांवर पडले, ज्यामुळे गोंधळ उडाला. गर्दीमुळे पडलेले लोक उठू शकले नाहीत आणि चेंगराचेंगरी झाली. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अनेक भाविक बॅरिकेड्स तोडून आखाड्यांच्या मार्गाने संगमाच्या दिशेने धावत होते, यामुळे चेंगराचेंगरीला तोंड फुटले.
घटनास्थळी मृतदेह आणि भाविकांच्या सामानांचा खच पडला होता. रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. रुग्णालयांबाहेर लोकांचा आक्रोश ऐकायला मिळाला. पत्रकारांनी घटनास्थळी मृतांचा आकडा ४० पर्यंत जाऊ शकतो, असे सांगितले, पण प्रशासनाने दुपारपर्यंत कुठलीही माहिती दिली नाही. अखेरीस, १६ तासांनी पोलिस उपमहासंचालक वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषद घेत ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाल्याचे जाहीर केले. मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली असून त्यात कर्नाटकमधील ४, आसाम आणि गुजरातमधील प्रत्येकी एक व्यक्ती आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वेळा फोन करून घटनांची माहिती घेतली. कुंभनगरीत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे योगींनी सांगितले आणि कोणताही अफवा पसरवू नये, असे आवाहन केले. चेंगराचेंगरीनंतर काही तासांसाठी अमृत स्नान थांबवण्यात आले, पण सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले. आखाड्यांनी स्नान सकाळी न करता दुपारी अडीच वाजता सुरू केले आणि शाही मिरवणूक काढण्याचे टाळले.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव शोक व्यक्त करत या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. राज्य सरकारने घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ३० जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. कुंभमेळा प्रशासनाने लोकांच्या मदतीसाठी १९२० हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.