नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी तीन कृषी कायद्यांना कडाडून विरोध केला. त्यांनी या तिन्ही कायद्यांच्या प्रती चक्क टराटरा फाडल्या. तसेच, आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला. दिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात हा प्रकार घडला.
आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली. “शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगत सिंह यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये” असं म्हणत या कायद्यांवरुन अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. कोरोना काळात घाई घाईने हे तीन कायदे संमत करुन घेण्याची मोदी सरकारला काय गरज होती? असाही प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. दिल्ली सरकारने गुरुवारी (१७ डिसेंबर) एकदिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी कृषी कायद्यांवर अनेक प्रश्न अपस्थित केले. यावेळी बोलताना, “देशात कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर करण्याची काय गरज होती? सरकारने एवढी घाई का केली. राज्यसभेत कुठलेही मतदान न करता कृषी विधेयके मंजूर केली गेली? असा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला. याच कारणामुळे मी हे तिन्ही कृषी कायदे फाडून टाकतोय,” असे केजरीवाल म्हणाले. तसेच, यावेळी केंद्र सरकारने इंग्रजांपेक्षाही क्रुर न होण्याचा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला.