नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना कोरोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१८ ते २०२० दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १६,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, तर ९,१४० लोक बेरोजगारीमुळे आपलं जीवन संपवलं.
कोणत्या वर्षात किती आत्महत्या
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की २०२० मध्ये ३,५४८, २०१९ मध्ये २,८५१ आणि २०१८ मध्ये २,७४१ लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
२०२० मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे ५,२१३ लोकांनी आत्महत्या केल्या, २०१९ मध्ये ५,९०८ आणि २०१८ मध्ये ४,९७० लोकांनी आत्महत्या केल्या. राय म्हणाले की, सरकार मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.