वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत इडा चक्रिवादळाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व अमेरिकेत प्रकोप निर्माण झाला आहे. या चक्रिवादळामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरसदृश परिस्थिती असून मेट्रो लाईन पाण्याखाली गेल्या आहेत आणि कार रस्त्यावर तरंगताना दिसत आहेत. आतापर्यंत किमान ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
वादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून सर्वत्र पाणी साचल्याने सबवे सेवा बंद झाली आहे. न्यूयॉर्कमधील परिस्थिती तर इतकी भीषण आहे की, महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली होती. “मी ५० वर्षांचा आहे आणि मी इतका पाऊस कधीच पाहिला नाही. हे जंगलात राहत असल्यासारखं होतं, अगदी उष्ण कटीबंधीय पावसाप्रमाणे. हा पाऊस, पूर सगळं खूप विचित्र असून अविश्वसनीय आहे,” असं मेटोडिजा मिहाजलोव एपीएफशी बोलताना म्हणाले. त्यांचे मॅनहॅटनमध्ये रेस्टॉरंट असून त्याचे तळघर तीन इंच पाण्याने भरले होते.
इडा चक्रीवादळामुळे ईशान्य अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. वादळामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. गार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क विमानतळावरून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळाचे टर्मिनल पावसाच्या पाण्याने भरलेले असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी वादळामुळे २३ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. वाहनांमध्ये अडकून बहुतांशी लोकांना मृत्यू झालाय. न्यूयॉर्क शहरात १२ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी ११ जणांना तळघरातून बाहेर पडता न आल्याने जीव गमवावा लागला.















