जळगाव (प्रतिनिधी) पत्नीचा विष प्राशनानंतर मृत्यू झाल्यानंतर पतीने देखील आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, माझ्या मुलीची पतीने हत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी केला आहे. प्रमोद शेटे असं रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी शेटे यांनी फेसबुक लाईव्ह करत पत्नी जगात नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्या प्रमोद शेटे याचे आपली पत्नी पत्नी कांचन शेटे (वाणी) सोबत वाद झाला. या वादानंतर कांचनने विष प्राशन केले. या गोष्टीचा धक्का बसल्यानंतर प्रमोद याने देखील आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आज मंगळवारी रूळांवर आढळून आला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात त्याने आपली पत्नी या जगात नसल्याने आपल्याला जगण्याचा मोह उरला नाही. त्यामुळे मी आपला चेहरा न दाखविता आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.