लोहारा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना १९ ऑगस्टला मध्यरात्री लोहाऱ्यात घडल्याने लोहाऱ्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. तर आरोपी स्वतःहून लोहारा पोलिसांत दाखल झाला. याबाबत पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
या दुर्दैवी घटनेत अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे. अर्चना शिंदे ही महिला व तिचा पती मजुरी करून आपल्यासह कुटुंबांचा चरितार्थ भागवत असत. मात्र, पती नितीन दौलत शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे. तसेच माहेरच्यांनी शेत विकले आहे, तू त्यांच्याकडून पैसे आण, अशी नितीन हा अर्चना शिंदे यांच्याकडे मागणी करत असे. तसेच अर्चना शिंदे यांची सासू बेबाबाई दौलत शिंदे या ही तिला नेहमीच शिवीगाळ करत असल्याचा आरोप मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडुबा सपकाळे (रा. शिवना, ता. सिल्लोड) यांनी केला आहे. दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून पती नितीन याने पत्नी अर्चना शिंदे यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना १९ ऑगस्टला मध्यरात्री घडली. त्यानंतर संशयित आरोपी नितीन हा स्वतःहून लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्यानी वर्मा यांनी तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तर फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी (होम) अरुण आव्हाड यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. तर याबाबत मयत अर्चना शिंदे यांचा भाऊ आकाश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन शिंदे याच्याविरुद्ध पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्यात कलम १०३(१), ८५, ११५(२), ३५२, ३ (५) या प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.